महागाईच्या आघाडीवर गुड न्यूज; सणासुदीत नागरिकांना मिळणार मोठा दिलासा?

ऑगस्ट 14, 2026 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून निघत आहे. किरकोळ महागाईने नागरिकांना त्रस्त केले असले, तरी ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तोरा उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. घाऊक महागाई दरात घट झाली असून, आगामी काळात तो आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घाऊक महागाई दर (WPI) जुलै महिन्यात ९.७८ टक्क्यांवर आला आहे. जून महिन्यात हा दर ९.८७ टक्के होता. त्यामुळे घाऊक महागाईत किंचित घट झाली आहे.

mahagai

जुलै महिन्यात इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई दरात मोठी घट झाली आहे. या क्षेत्राचा महागाई दर २०.०५ टक्क्यांवर आला असून, जूनमध्ये तो २७.४१ टक्के होता. मे महिन्यात हाच दर ३०.३३ टक्के होता. त्यामुळे इंधन आणि विजेच्या दरातील घट ही महागाई कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

खाद्यपदार्थांच्या दरवाढीने चिंता कायम

घाऊक महागाई दरात घट झाली असली तरी प्राथमिक खाद्यपदार्थांच्या महागाईचा दबाव कायम आहे. जुलैमध्ये प्राथमिक खाद्यपदार्थांचा महागाई दर ८.५२ टक्के राहिला. जूनमध्ये हा दर ७ टक्के होता. साखरेसह काही खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चावर परिणाम होत आहे.

दरम्यान, किरकोळ महागाई दर जूनमधील ४.३८ टक्क्यांवरून जुलैमध्ये ४.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला उपाययोजना करण्याची गरज आहे.

सणासुदीत मिळू शकतो दिलासा

रॉयटर्सच्या अंदाजानुसार जुलैमध्ये घाऊक महागाई दर ९.९५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हा दर ९.७८ टक्क्यांवर राहिला. घाऊक महागाई दरात झालेली घट आगामी काळात किरकोळ बाजारातील महागाईवरही परिणाम करू शकते. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात येणे हे त्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now