रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत १ ऑगस्टपासून मोठा बदल; काय आहे घ्या जाणून..

जुलै 28, 2026 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही तत्काळ रेल्वे तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावरील आरक्षण काउंटरवर जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर जाऊन तत्काळ (Tatkal) तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी १ ऑगस्टपासून मोठा बदल लागू होणार आहे. भारतीय रेल्वेने काउंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी नवी टोकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

railway ticket jpg webp

नेमका काय आहे नवीन नियम?

आतापर्यंत तत्काळ तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तासनतास लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत होते. तसेच, टोकन घेण्यासाठी एका काउंटरवर आणि तिकीट बुक करण्यासाठी दुसऱ्या काउंटरवर अशी दुहेरी पायपीट करावी लागत होती. मात्र, नव्या नियमामुळे हा त्रास आता कायमचा बंद होणार आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत आरक्षण काउंटरवर येणाऱ्या प्रवाशाला आधी थेट एक टोकन दिले जाईल. टोकन मिळाल्यानंतर प्रवाशाला रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. टोकन क्रमांकाच्या क्रमाने जेव्हा तुमची पाळी येईल, तेव्हाच तुम्हाला काउंटरवर जाऊन तिकीट बुक करता येईल.

यापूर्वी अनेक ठिकाणी प्रवाशांना प्रथम टोकन घेण्यासाठी स्वतंत्र काउंटरवर जावे लागत होते. त्यानंतर पुन्हा आरक्षणासाठी दुसऱ्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत होता. विशेषतः तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

प्रवाशांना काय होणार फायदा?

नवीन टोकन प्रणालीमुळे प्रवाशांना एकदाच टोकन घ्यावे लागेल. त्यानंतर आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करता येईल. यामुळे काउंटरसमोर होणारी धक्काबुक्की कमी होईल, रांगा अधिक शिस्तबद्ध राहतील आणि तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद व सुलभ होईल. तसेच आरक्षण कर्मचाऱ्यांनाही कामकाज अधिक व्यवस्थितपणे हाताळणे शक्य होणार आहे.

तिकीट बुक करताना ही कागदपत्रे सोबत ठेवा

तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण काउंटरवर जाताना आधार कार्ड किंवा अन्य वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे, वय, लिंग, प्रवासाची तारीख, गंतव्यस्थान आणि इतर आवश्यक माहिती आधीच तयार ठेवल्यास तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते.

रेल्वेच्या या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंग अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रवासीहिताची होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १ ऑगस्टपासून ही टोकन प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील आरक्षण केंद्रांवर तिचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now