जळगाव लाईव्ह न्यूज | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर संपली असून आज (२२ जुलै) पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याचबरोबर कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादीही आज प्रसिद्ध करण्यात येणार असून या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दुपारी 3 वाजता शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची घोषणा केली. अजित पवार यांची आज जयंती आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आजच कर्जमाफीची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. दुपारी 3 वाजता कर्जमाफीची यादी जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद होणार आहे. मंत्रालयात ही पत्रकार परिषद होणार आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीककर्जाची परतफेड केली आहे, तसेच जे शेतकरी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसतात, अशा पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट असणार आहेत. सहकार विभागाने सर्व जिल्ह्यांमधील माहिती एकत्र करून ही यादी तयार केली आहे. आज ही यादी जाहीर झाल्यानंतर शेतकरी आपापल्या बँक शाखांमध्ये किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आपले नाव तपासू शकतील.
शेतकऱ्यांना थेट बँकेत मिळणार लाभ
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाले आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल. ज्यांचे केवायसी बाकी आहे, त्यांना ते तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











