जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जुलै महिन्यांचा १५०० रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्यभरातील लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला तरी ऑगस्टचा निधी जमा न झाल्याने हा हप्ता नेमका कधी मिळणार, याविषयी चर्चा रंगली आहे. मात्र, येत्या गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या खात्यात हा निधी वितरित केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १६ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्माननिधी टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही आर्थिक मदत देण्याची तयारी केली जात असल्याचे समजते. ऑगस्टच्या हप्त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या तारखेबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून ही तारीख संभाव्य मानली जात आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना मिळत आहे. २१ ते ६५ वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT द्वारे) दिली जाते.
‘ही’ काळजी घेणे आवश्यक
ऑगस्टचा हप्ता जमा होताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक (Aadhaar Link) आहे की नाही आणि डीबीटी (DBT) पर्याय सक्रिय आहे की नाही, याची खात्री करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता १६ सप्टेंबरनंतर हा निधी कधी आणि कसा जमा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










