जळगाव लाईव्ह न्यूज | चाळीसगाव येथे प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाचोरा आणि भडगाव तालुका जोडण्याच्या हालचालींना पाचोराचे आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. “यासाठी माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल, पण पाचोरा-भडगाव तालुका चाळीसगावला जोडू देणार नाही. गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा आक्रमक इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आमदार किशोर पाटील म्हणाले की, चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, एका व्यक्तीच्या हट्टापायी पाचोरा आणि भडगाव तालुका या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. चाळीसगावला जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अन्य सुविधा द्याव्यात, त्यालाही आमचा विरोध नाही. मात्र, पाचोरा-भडगाव तालुका त्यात समाविष्ट करू नये.

त्यांनी सांगितले की, पाचोरा तालुका भौगोलिकदृष्ट्या जळगावशी जोडलेला असून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि शासकीय रुग्णालयाची सर्व कामे नागरिकांना जळगाव येथे करणे अधिक सोयीचे आहे. पिंपळगाव हरेश्वर, बांबरुड राणीचे, लोहारा, सातगाव डोंगरी, सामनेर, शिंदाड यांसह पूर्व भागातील २० ते २२ गावांसाठी चाळीसगावचे अंतर ७० ते ८० किलोमीटर आहे, तर जळगाव केवळ १५ ते २० किलोमीटरवर आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लागू झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
या निर्णयाविरोधात पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना पाठवून प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहितीही आमदार किशोर पाटील यांनी दिली.












