भुसावळ–वर्धा पॅसेंजरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणाला शिकवला धडा! ओठांना लिपस्टिक, हातात बांगड्या अन्..

जुलै 17, 2026 6:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुसावळ–वर्धा मेमो रेल्वेत एका तरुणाने महिला प्रवाशाची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र संबंधित महिलेने भीती न बाळगता त्याला ठामपणे विरोध केला. तिच्या मदतीला इतर प्रवासी धावून आल्याने आरोपीला जागेवरच पकडण्यात आले आणि त्याला ‘गांधीगिरी’च्या अनोख्या पद्धतीने धडा शिकवण्यात आला.

mmd

माहितीनुसार, शेगावहून बडनेराकडे जाणाऱ्या भुसावळ–वर्धा मेमो मध्ये प्रवासादरम्यान एका तरुणाने महिला प्रवाशाशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महिलेने हा प्रकार दुर्लक्षित केला. मात्र संबंधित तरुण वारंवार गैरवर्तन करत असल्याने तिने त्याला सर्वांसमोर जाब विचारत विरोध केला.

महिलेचा आवाज ऐकताच डब्यातील इतर प्रवासी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी आरोपी तरुणाला पकडून त्याच्या हातात बांगड्या घातल्या. एवढ्यावरच न थांबता त्याच्या ओठांवर लिपस्टिक आणि चेहऱ्यावर लाली लावत त्याला महिलांचा सन्मान करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ रेल्वे डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे आणि सहप्रवाशांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. तर काहींनी अशा प्रकरणांमध्ये केवळ सामाजिक शिक्षा न देता आरोपींवर रेल्वे पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या घटनेने महिलांविरोधातील गैरवर्तनाच्या घटनांवर तातडीने आवाज उठवण्याची गरज अधोरेखित केली असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सजग राहण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now