जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२६ । जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रेमंड चौफुली जवळ शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर ईश्वर सपकाळे (वय २५, रा. धामणगाव, ता. जळगाव) आणि पीयुष प्रदीप बेंडाळे (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) हे दोघे तरुण जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी सायंकाळी कंपनीतील काम आटपून ते आपल्या दुचाकीने घरी परतत होते.

ते रेमंड चौफुली जवळ आले असता, छत्रपती संभाजीनगरकडून जळगाव शहराच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक: TN 47 AQ 8403) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन्ही जखमी तरुणांना तात्काळ एका खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसात अद्याप कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती.









