जळगाव लाईव्ह न्यूज । भडगावच्या वडगाव (सतीचे) शिवारात खाजगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीला अडवून मारहाण करत पैशांची बॅग जबरीने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील यश हिरामण हटकर (वय २३) हे ‘भारत फायनान्स’ कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते वडगाव (सतीचे) येथून भडगावकडे मोटारसायकलने जात असताना गावाबाहेरील कच्च्या रस्त्यावर तीन अज्ञातांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या मोटारसायकलवरील बॅग हिसकावून नेली. या बॅगेत ग्राहकांकडून जमा केलेली ५१ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम तसेच ५ हजार रुपये किमतीचा ‘नोव्हा’ कंपनीचा टॅब असा एकूण ५६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भडगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने १४ जुलै रोजी वडगाव शिवारात सापळा रचून पाचही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी लूटमारीची कबुली दिली.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धुळे जिल्ह्यातील चार तर भडगाव तालुक्यातील एका आरोपीचा समावेश आहे. उदय छोटू गायकवाड (२२), योगेश प्रकाश पवार (२४), निलेश आनंदा पवार (२१), विशाल मधुकर गांगुर्डे (२३) हे सर्व रा. अनकवाडी, ता. जि. धुळे तसेच अनिल दिलीप पाटील (२६, रा. पळसखेडे, ता. भडगाव) असं अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे
यांनी केली कारवाई :
ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांच्या पथकाने केली. अटक आरोपींना पुढील तपासासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश टाक आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.









