जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही महिण्यापासून जळगाव शहरात दुचाकी चोऱ्यांच्या घटनांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र आता दुचाकी चोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. एका दिवसात रामानंदनगर, जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत जिल्ह्यात एकूण ७०७ चोरीचे गुन्हे नोंदवले गेले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे दुचाकी चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिली घटना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली. कन्यानगर, मेहरूण येथील मंगेश छगन वाघ (वय ३३) यांनी आपली हीरो फॅशन प्रो (एमएच-१९ बीझेड-८१९४) ही सुमारे ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी रुग्णालयाबाहेर उभी केली होती. अवघ्या काही वेळातच अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करत आहेत.

दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासमवाडी आठवडे बाजार परिसरात घडली. भुसावळ येथील दीपक बळवंतसिंग चितोडिया (वय १९) यांची हीरो एचएफ डिलक्स (एमएच-१९ डीडी-४०९९) ही सुमारे ४० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार लाडवंजारी पुढील तपास करत आहेत.
तिसरी घटना रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिविठ्ठल नगर भागात घडली. मनोज अरुण ब्रामाणकर (वय ३६) यांची स्प्लेंडर प्लस (एमएच-१९ एडब्ल्यू-३६७२) ही सुमारे १० हजार रुपये किमतीची दुचाकी घराबाहेरून चोरीला गेली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत तपास करत आहेत.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शहरात पुन्हा दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांनी सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करणे, स्टिअरिंग लॉक किंवा अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करणे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










