अमळनेर हादरले! विवाहितेचे मुलासह अपहरण; २ महिने डांबून अत्याचार, संशयित नराधम अटकेत

जुलै 16, 2026 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोन्याचे दागिने करण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय विवाहितेचे तिच्या मुलासह अपहरण केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे उघडकीस आली आहे. अपहरणानंतर पीडितेला तब्बल दोन महिने डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करत सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) या संशयिताला अटक केलीय.

crime 1 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही शेतमजूर असून पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती आई-वडिलांकडे राहत होती. लाडकी बहीण योजनेचे लाभ व मजुरीतून तिच्याकडे सुमारे ७० हजार रुपये असल्याची माहिती आरोपी सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) याला मिळाली होती.

आरोपीने पीडितेला सोन्याचे दागिने करून देण्यासाठी अमळनेरला नेण्याचे आमिष दाखवले. मात्र, सोनार गल्लीत न नेता दुसऱ्या वाहनात बसवून तिचे व तिच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप आहे. यावेळी जीवे मारण्याची धमकी देत तिला बहाळ आणि शिरपूरजवळील विमानतळ परिसरातील एका तांड्यावर नेण्यात आले. तेथे तिला दोन महिन्यांपर्यंत डांबून ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी बाहेर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या मुलासह तेथून पलायन केले. त्यानंतर तिने कमखेडा येथील बहिणीच्या घरी आश्रय घेत संपूर्ण प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यांच्या मदतीने तिने मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरण व बलात्कारासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्या पथकाने बुधवारी पहाटे आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मारवड पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now