जळगावात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; घरात लपवून ठेवलेला अवैध गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा

जुलै 2, 2026 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगुबाई शाळेजवळ असलेल्या रुबी अपार्टमेंटमधील एका घरावर छापा टाकून प्रशासनाने ६१ हजार ६४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

gutka

अन्न सुरक्षा अधिकारी अमोल कैलास जगताप (वय ३०) यांनी याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. २९ जून २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजेच्या सुमारास गंगुबाई शाळेजवळील रुबी अपार्टमेंटमध्ये काही व्यक्ती त्यांच्या घरात चोरट्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर तेथून प्रिमियम विमल पान मसाला, मिराज सेंटेड तंबाखू, व्ही-१ तंबाखू, डायरेक्ट पान मसाला आणि करमचंद पान मसाला अशा विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. या मुद्देमालाची एकूण किंमत ६१ हजार ६४ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित गुटखा शहरात कुठून आणला जात होता आणि त्याचे वितरण कुठे केले जात होते, याचा तपास शनिपेठ पोलिस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now