जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार खरेदीच्या बहाण्याने एका भंगार व्यावसायिकाला बोलावून, त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवत बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल लुटून, त्यांना विवस्त्र करत त्यांचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ हुसेन अब्दुल सत्तार अन्सारी हे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ‘शिवा’ नावाच्या एका व्यक्तीने अल्ताफ अन्सारी यांच्याशी संपर्क साधून, आपल्याकडे सुमारे १५० टन ॲल्युमिनियम स्क्रॅप (भंगार) विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगत त्यांना हलखेडा येथे पाहणीसाठी बोलावले होते. मोठ्या प्रमाणावर व्यवहार असल्याने, १८ जून रोजी सकाळी अल्ताफ अन्सारी हे आपल्या मुलासह आणि मित्र पिरमहमद सय्यद यांच्यासोबत हलखेडा येथे पोहोचले.

अल्ताफ अन्सारी हे ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, तेथे आधीच दबा धरून बसलेल्या शिवा आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. काही समजण्याच्या आतच संशयितांनी अन्सारी यांच्यावर थेट बंदुकीचा धाक दाखवला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
शिवा व त्याच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत अल्ताफ अन्सारी यांच्याकडील रोख रक्कम, बँक खात्यातील पैसे, मोबाईल फोन, चांदीची अंगठी, घड्याळ असा एकूण ४ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्ताफ अन्सारी यांना विवस्त्र करून त्यांचा व्हिडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना तेथून निघून जाण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहे.











