दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांकडून पर्दाफाश; कट्टा, काडतुसेसह दोन जण जेरबंद

मे 30, 2026 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड आणि बनावट क्रमांक प्लेटसह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहेत. चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव असून या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.

crime 2 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर पहाटे एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. यावेळी परिसरात गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण घटनास्थळावरून पळून गेले. मात्र वाहनात असलेल्या अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन तसेच बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले.

तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांत सुमारे १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चंद्रकांत वाघ आणि कैलास घोडके या दोघांना अटक करण्यात आली आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now