महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय ; नोकरभरती प्रक्रियेत केला हा मोठा बदल

मे 6, 2026 1:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यानुसार वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ सोबतच आता वर्ग ‘क’ ची कर्मचारी भरतीही थेट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) केली जाणार आहे. यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याच्या त्रासातून विद्यार्थ्यांची कायमची सुटका होणार असून, परीक्षांचा आर्थिक आणि मानसिक ताण कमी होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) मंगळवारी जारी करण्यात आला आहे.

office

मुलाखती पूर्णपणे बंद; फक्त लेखी परीक्षेवर निवड

नवीन नियमांनुसार, गट-ब (अराजपत्रित अधिकारी) आणि गट-क च्या पदांसाठी आता कोणत्याही मुलाखती (Interviews) होणार नाहीत. उमेदवारांची निवड केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच केली जाईल. यामुळे मुलाखतींच्या नावाखाली होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना आणि वशिल्याच्या तत्त्वाला चाप बसणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे.

५५३ संवर्गांच्या नियमांत बदल; एकसंध परीक्षा प्रणाली

आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून समान पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जात होत्या. यामुळे भरती प्रक्रियेत कमालीचा विलंब होत असे. आता सरकारने एकूण ५५३ संवर्गांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या ‘एकसंध परीक्षा प्रणाली’मुळे प्रशासकीय गुंतागुंत दूर होऊन भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल.

बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करता प्रशासनातील जी पदे आता कालबाह्य झाली आहेत, ती ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित केली जातील. मात्र, या पदांवर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती आणि हक्कांना कोणताही धक्का लागणार नाही, ते अबाधित राहतील. काही राजपत्रित व अराजपत्रित पदे जी थेट मुलाखतीद्वारे भरली जात होती, ती आता थेट न भरता पदोन्नती (Promotion) किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जातील. यामुळे आधीपासूनच सेवेत असलेल्या विभागीय कर्मचाऱ्यांना प्रगतीची आणि वरच्या पदावर जाण्याची अधिक संधी मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now