एटीएममध्ये हातचलाखी; सेवानिवृत्त वृद्धाचे कार्ड बदलवून लाखो रुपये लंपास, जळगावातील धक्कादायक घटना

एप्रिल 15, 2026 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एटीएम केंद्रावर मदतीच्या बहाण्याने येणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जळगाव शहरात जलसंपदा विभागातील एका सेवानिवृत्त वृद्धाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलवून त्यांच्या खात्यातून तब्बल २ लाख ३१ हजार ३६९ रुपये लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना राजकमल टॉकीज परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात घडली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

atm card fraud

नेमकी घटना काय?

रायपूर (ता. जळगाव) येथील रहिवासी देविदास रामा कोळी (वय ६१) हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २६ मार्च रोजी दुपारी ते राजकमल टॉकीज जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी २० हजार रुपये काढल्यानंतर, त्यांच्या मागे रांगेत हेल्मेट घालून उभा असलेल्या एका तरुणाने त्यांना गाठले.

“बाबा तुमचे कार्ड दाखवा,” असे म्हणत त्या तरुणाने कोळी यांच्या हातातील कार्ड बघण्याच्या बहाण्याने घेतले. अत्यंत चपळाईने त्याने कोळी यांचे मूळ कार्ड स्वतःकडे ठेवून घेत दुसरेच एक कार्ड त्यांच्या हातात टेकवले. कोळी यांना या प्रकाराची पुसटशी कल्पनाही आली नाही.

बँकेत गेल्यावर बसला धक्का

३० मार्च रोजी देविदास कोळी यांना ५० हजार रुपयांची गरज असल्याने ते बँकेत गेले. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगताच त्यांना धक्का बसला. बँकेचे स्टेटमेंट तपासले असता, २६ ते ३० मार्च या अवघ्या पाच दिवसांत भामट्याने वेगवेगळ्या एटीएममधून २,३१,३९६ रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघड झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी यांनी आपल्या जवळील एटीएम कार्ड नीट तपासले असता, त्यावर ‘अनूपकुमार श्रीवास्तव’ असे नाव असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे खात्री पटल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.जिल्हापेठ पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या हेल्मेटधारी भामट्याचा शोध घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now