जळगाव लाईव्ह न्यूज । नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरणार असून नियमांची माहिती नसल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

नव्या नियमानुसार, ट्रेन सुटण्याच्या किमान ८ तास आधी तिकीट रद्द करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर प्रवाशांनी या कालावधीनंतर तिकीट कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना कोणताही परतावा मिळणार नाही. याआधी हा कालावधी ४ तासांचा होता. त्यामुळे आता प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आधी निर्णय घ्यावा लागणार आहे.

तसेच रिफंडच्या टक्केवारीतही बदल करण्यात आले आहेत. प्रवास सुरू होण्याच्या ८ ते २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम परत मिळणार आहे. २४ ते ७२ तास आधी कॅन्सलेशन केल्यास ७५ टक्के रिफंड मिळेल, तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे.
या नव्या नियमांमुळे रेल्वेच्या कॅन्सलेशन प्रक्रियेत अधिक शिस्त येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून तिकीट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












