जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२६ । गेल्या आठवड्यात ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचून नागरिकांना हैराण करणाऱ्या उष्णतेने अखेर काहीशी माघार घेतली आहे. सततच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना या आठवड्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानात तब्बल ४ अंशांची घट झाली आहे.

सोमवार (१६ मार्च) रोजी जळगावचे कमाल तापमान ३६.७ अंशांवर नोंदवले गेले, जे गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी जाणवणारा उकाडा आणि दाह लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी तापमानात घसरण झालीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात ताशी १५ ते २० किमी वेगाने वाहणारे वारे तापमान कमी होण्यामागील मुख्य कारण ठरत आहेत. या वेगवान वाऱ्यांमुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असून हवेत गारव्याची हलकी चाहूल लागली आहे.
गेल्या आठवड्यात सलग चार दिवस ४० अंशांवर स्थिर राहिलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता बदललेल्या हवामानामुळे जळगावमध्ये काहीसा दिलासादायक आणि सुसह्य वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान विभागाने नांदेड, सोलापूर, लातूर, नागपूर, भंडारा, गोदिंया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागाता पावसाचा येलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा आज अंदाज आहे. बाकी उर्वरित राज्यात उकाडा असेल.
१८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. २१ मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार आहे.










