जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या तापमानात वाढ झाल्यानं थंडी कमी झाली आहे. तसेच अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज जळगावसह ६ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच २३ जानेवारी रोजी राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. दुपारी उन्हाचा कडाका असणार आहे. तसेच पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या ६ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव शहरात सध्या विषम वातावरण पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी किमान तापमान ११.१ इतके होते तर कमाल तापमान २९.९ अंशांपर्यंत पोहोचले. ज्यामुळे दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवू लागला आहे.
तापमानात सतत होणाऱ्या चढ उतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आहे. दरम्यान याचा फटका शेतकरी वर्गाला देखील बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर देखील गंभीर परिणाम होत आहेत.










