जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२५ । नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारने दरवाढीचा ‘धक्का’ दिला आहे. रेल्वेने तिकीटाच्या रकमेत वाढ केली असून ती आज २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. वर्षातील ही दुसरी दरवाढ आहे.

रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी 215 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी सामान्य श्रेणीच्या तिकिटांच्या किमतीत प्रति किलोमीटर एक पैशाने तर मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील सर्व गाड्यांच्या नॉन-एस आणि एसी वर्गांसाठी तिकिटाच्या किमतीत प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्याची अधिसूचना जारी केली.

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रवाशांना परवडणारे भाडे आणि रेल्वेचे कामकाज यांच्यात समतोल राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही रेल्वे भाड्यात वाढ करण्यात आली होती. २१५ किलोमीटरपर्यतच्या प्रवासासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजच्या पासधारक प्रवाशांना याचा फटका बसणार नाही.
अशी असेल दरवाढ
साधारण नॉन-एसी (215 किमी नंतर) : 1 पैसा वाढ.
मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी) : 2 पैसे वाढ.
सर्व एसी कोचेस : 2 पैसे वाढ.
म्हणजेच 216 किमी ते 750 किमी अंतरासाठी भाडे 5 रुपयांनी वाढेल. 751 किमी ते 1250 किमी अंतरासाठी 10 रुपये, 1251 किलोमीटर ते 1750 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी 15 रुपये आणि 1751 किलोमीटर ते 2250 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपयांची वाढ होईल.
या तिकीटांवर भाडेवाढ नाही
राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्सप्रेस, नमो भारत रॅपिड रेल सह इतर विशेष गाड्यांनाही वर्गवार भाडेवाढ लागू होईल. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क इत्यादींमध्ये कोणताही बदल नाही. जीएसटी देखील लागू राहील. तसेच रेल्वेचे हे “सुधारित भाड” फक्त आजपासून (26 डिसेंबर) किंवा आजनंतर बुक केलेल्या तिकिटांना लागू होतील. या तारखेपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर प्रवास आजच्या तारखेनंतर केला गेला तरीही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.











