जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच एरंडोल-कासोदा मार्गावर आज शुक्रवारी सकाळी एसटी बसला मोठा अपघात झाला. बस थेट खोल नाल्यात पलटल्याने झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

काय आहे घटना?
एरंडोल बस आगाराची बस (क्रमांक MH 20 BL 4302) ही भडगाव कडून एरंडोल कडे येत असताना एरंडोल पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणालगत असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाऊन पडली. सदर बस ही खोल नाल्यात पडल्याने प्रवाशांना मागच्या व पुढच्या काचेतून तसेच खिडकीच्या बाहेर काढण्यात आले.

या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ३५ किरकोळ जखमींवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एरंडोल-कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.








