जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । राज्यात सध्या पाऊस सुरु असून यामुळे अनेक ठिकाणी चिखलमय रस्त्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान आतच बऱ्हाणपूरकडून अक्कलकुवा कडे जाणारी प्रवाशांनी भरलेली महामंडळाची बस चिखलात अडकली. चिखलातुन बस निघू न शकल्याने बसमधील प्रवाशांना भर पावसात दुसऱ्या बसची वाट बघत नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस ही बऱ्हाणपूरहून जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, शहादा मार्गे अक्कलकुवा जात होती. मात्र शहादा तालुक्यातील होळ उंटावद गावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल झाला होता. एकेरी मार्ग असल्याने एकच वाहन जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. यातच बस थोडी रस्त्याच्या खाली उतरविल्याने बस चिखलात अडकली. यामुळे बस मागेही होईना व पुढेही जाईना. बराच वेळ चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बस निघू शकली नाही.

दरम्यान प्रवाशांना बराच काळ बसमध्ये अडकून बसावे लागले. बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर निघता येत नव्हते. बऱ्याच काळानंतर शहादा आगारातून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. हि बस येण्यास देखील बराच वेळ लागला. तोपर्यंत प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.











