जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । आधीच भारतात गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. यातच आता भारतीयांचं किचन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कारण गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.

त्यामागील कारण म्हणजे, इराण आणि इस्त्रायलमधील युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या अणु तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर पश्चिम आशियात तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या या कृतीनंतर कच्च्या तेलाच्या किमती जानेवारीनंतर पहिल्यांदाच विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत, त्यामुळे पेट्रोल डिझेलच नव्हे तर एलपीजी सिलिंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर इराणने काही कारवाई केली तर येत्या काळात तेल आणि एलपीजीचा पुरवठा थांबू शकतो. असं झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडरच्या किंमती भडकण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.
खरं तर, भारतात वापरल्या जाणाऱ्या तीनपैकी दोन एलपीजी सिलिंडर पश्चिम आशियातून येतात. जर तिथून पुरवठा थांबला तर भारतातील सामान्य लोकांना पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसेल. गेल्या एका दशकात सरकारच्या प्रयत्नानंतर भारतात एलपीजीचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. 33 कोटी घरात एलपीजी गॅसचा वापर करण्यात येतो. भारत यासाठी दुसर्या देशांवरच अवलंबून आहे. एकूण एलपीजीचा जवळपास 66 टक्के वाटा परदेशाचा आहे. त्यातील जवळपास 95 टक्के वाटा हा सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि कतार या पश्चिम आशियातील देशामधील आहे.
केवळ 16 दिवसांचा साठा
इकोनॉमिक टाईम्सच्या वृ्त्तानुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताकडे आयात टर्मिनल, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लँट्समध्ये केवळ 16 दिवस पुरेल इतक्याच साठ्याची क्षमता आहे. तर पेट्रोल आणि डिझेलबाबत भारत हा निर्यातदार झाला आहे. भारत कच्चे तेल आयात करतो. त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्यात येते. आता जर हे युद्ध अजून ताणल्या गेले अथवा या युद्धात रशिया, चीन पैकी कोणी उतरलं तर युद्ध दीर्घकाळ चालण्याची भीती आहे. त्यामुळे इराणमधील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. भारताने अमेरिकेकडून इंधन आयात कमी केली आहे. रशिया आणि पश्चिम आशियायी देशातून ती वाढवली आहे. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यास गॅससह पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












