शेतीला मिळणार दिवसाही वीजपुरवठा! जळगाव जिल्ह्यात उभारले जाणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जुलै 30, 2025 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । जिल्हा नियोजन समिती सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून जळगाव जिल्ह्यात 850 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.

farmer

यामधून 153 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यापैकी 68 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेला लोकसंवाद व सहकार्यातून गती देण्यात यावी, असे निर्देशही लोकेश चंद्र यांनी दिले.

श्री. चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सौर कृषी वाहिनी योजना-2.0 इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील वर्षभरात 16,000 मेगावॅट वीज दिवसा शेतीसाठी पुरविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या योजनेचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याला भेट देत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 153 उपकेंद्रांच्या ठिकाणी 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून, 14 उपकेंद्रांमध्ये 68 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, गैरसमज दूर करावेत आणि टास्क फोर्सने लोकसंवाद, सहकार्य व प्रबोधनातून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे व पायाभूत सुविधा विकसित करणे यावर भर देण्याचेही त्यांनी सुचविले.

ग्रामसभेत सौर योजनांचा प्रसार करा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि मागणीवर आधारित सौर कृषिपंप यासारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक संवाद व प्रबोधन महत्त्वाचे असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनांना गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनांची माहिती देऊन गावागावांत जागृती करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. चंद्र यांनी यावेळी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now