⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | आरोग्य | वन्यप्राण्यांवर उपचारासाठी ८ कोटी ८३ लाखांचे हॉस्पीटल; वाचा सविस्तर

वन्यप्राण्यांवर उपचारासाठी ८ कोटी ८३ लाखांचे हॉस्पीटल; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : २३ मार्च २०२३ : मानवी आरोग्यासाठी सर्वत्र हॉस्पिटलसह अन्य अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात. मात्र जेंव्हा प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न येतो तेंव्हा पाळीव, गायी, म्हशी, कुत्रे किंवा मांजरींच्या पलीकडे पेटकेअरचा विषय जात नाही. दुसरीकडे, वन्यप्राण्यांवरील उपचाराचा प्रश्‍न कायद्याच्या कचाट्यात अडकत असतो. मात्र आता वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) उभारण्यात येणार आहे. जळगाव येथे उभारण्यात येणार्‍या या केंद्रासाठी तब्बल ८ कोटी ८३ लाखांचा निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रमाणापेक्षा जास्त केलेला हस्तक्षेप आता त्यांच्या जीवाला धोकादायक ठरताना दिसत आहे. यामुळेच अन्नाच्या शोधात हिंस्र वन्यप्राणी आपला आधिवास सोडून मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत. यामुळे प्राण्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. त्यातून प्राणी जखमी होत असतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. यादृष्टीने जळगाव वन विभागाने जळगाव शहरालगत असलेल्या लांडोरखोरी वनक्षेत्रात सुमारे १ हेक्टर क्षेत्रावर ८ कोटी ८३ लाख रुपये निधीतून ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव सादर केला. त्यास मान्यता मिळाली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प होत आहे. यासाठी वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास आता मंजूरी मिळाली आहे. वाढती लोकसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेल्या पद्धतीमुळे वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत असून, मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने अपघाताने जखमी होण्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी जखमी वन्य प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.