⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मालमत्तांच्या फेरमूल्यांकनात ५० पट करवाढ, करदात्यांची लूट : सभागृह नेते ललित कोल्हे

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । महापालिकेच्या माध्यमातून गेल्या दाेन वर्षात करण्यात आलेल्या मालमत्तांच्या फेरमूल्यांकनात असंख्य चुका झाल्या आहेत. बांधकामात काेणताही बदल केलेला नसतानाही नाेटीस बजावल्या जात आहेत. काही मालमत्तांवर तर ५० पट वाढ केल्याचा दावा करत सभागृह नेते ललित काेल्हे यांनी प्रशासनाकडून करदात्यांची हाेणारी लुट थांबवण्याची मागणी केली आहे. हा विषय येत्या महासभेत चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेने अमरावती येथील एजन्सीच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यात मालमत्तांच्या संख्येत वाढ झाली. बहुसंख्य मालमत्तांच्या बांधकामात बदल झाले. त्यानुसार मनपाने वाढीव कराच्या नाेटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. यातून अनेक चुकीच्या बाबी समाेर येत असल्याने सभागृह नेते काेल्हे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

गेली दाेन वर्ष नागरीक काेराेना महामारीने त्रस्त आहेत. अनेकांचे राेजगार गेले असून व्यवसायात नुकसान साेसावे लागले आहे. अशा परिस्थितीत पालिका अचानक करात वाढ करणार असल्याने आर्थिक संकट उभे राहण्याची भिती व्यक्त केली. वास्तविक पालिकेने दर पाच वर्षांनी हे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासनाने अनेक वर्षानंतर केलेल्या सर्वेक्षणानंतर फेरमूल्यांकनात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर ५० पट वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात शहराची काेणतीही वाढ झालेली नाही. उद्याेगधंदे स्थलांतरीत झाले आहेत. अशा परिस्थितीत करवाढीचा नागरीकांवर बाेजा पडणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आपली भूमिका मांडावी अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशाराही त्यांनी दिला.

हे देखील वाचा :