⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मुक्ताईनगरात दुकानदाराला ४३ हजारांचा चुना

ळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । पोलिस ठाण्यापासून जवळ असलेल्या एका किराणा दुकानावर भाचीचे लग्न असून मेहुणे एस.टी. संपात असल्याने किराण्याची यादी देवून माल माेजून घेतला आणि ताे गाडीत ठेवून एकाने चक्क पलायन करून दुकानदाराला सुमारेे ४३ हजारांना गंडवल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा दाेन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान चोरीचा हा नवीनच फंडा सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शहरातील तहसील रोडवर संतोष रघुनाथ सापधरे यांचे श्री गजानन प्रोव्हिजन नावाने मोठे होलसेल किराणा दुकान अाहे. मंगळवारी दुपारी ते दुकानात बसलेले असताना एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र.एमएच १२ ६९८९) आला. स्वतःचे नाव जाधव असल्याचे सांगून भाचीचे लग्न आहे, जिजाजी मात्र एस.टी. संपात असल्याने त्यांनी मला किराणा घ्यायला पाठवले असून राेख खरेदी करावयाची असल्याने मालाचे भाव व्यवस्थित लावा, असे सांगून एक यादी दिली. तसेच लवकर साहित्य काढण्याच्या सूचनाही केली. त्यानुसार संतोष सापधरे व त्यांचे वडील रघुनाथ सापधरे यांनी तातडीने सर्व साहित्य यादीनुसार काढून नीट पॅकिंग करून दिली. त्या व्यक्तीच्या सूचनेनुसार सर्व माल कारमध्ये ठेवला. ती व्यक्ती लगेच दुकानात येवून बिल अदा करेल, या अंदाजाने सापधरे दुकानात शिरताच त्या व्यक्तीने गाडी वळवून घेतो, असे सांगून भरधाव गाडी चालवत पळून गेला. दुकान मालक सापधरेंना काही कळेल त्याच्या आत त्या भामट्याने पोबारा केला. संतोष सापधरे यांनी गाडीचा दुचाकीने पाठलाग करण्याच्या प्रयत्न केला. परंतु भामटा पलायनासह दुकानदाराला सुमारे ४३ हजारांचा चुना लावण्यात यशस्वी झाला.