⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तळेगावात सर्पदंशाने ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील रोहीणी खंडू पाडोळसे ( वय ४ ) या चिमुरडीचा रात्री झोपेत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. घरात काकाच्या लग्नाची तयारी सुरु असतांना आदल्या दिवशी या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांच्या आनंदावर विरजन पडले.

२६ रोजी रात्री साडे बारा वाजता रोहीणी खंडू पाडोळसे ही झोपेत असताना तिला सर्प दंश झाला. गावात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला जामनेर येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जामनेर येथे वाहनाने जात असताना रस्त्यातच तिने प्राण सोडले. रोहिणीच्या लहान भावाला निमोनिया झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे वडील खंडू पाडोळसे हे रुग्णालयात होते. त्यामुळे रोहिणी आत्याकडे होती. तर २७ तारखेला रोहिणीच्या काकाचे लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरु होती. राेहिणीने आत्याकडे हट्ट करून काकाच्या लग्नासाठी नवीन कपडे, मेंदी, टिकलीचे पाकीट खरेदी केले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. २६ रोजी रात्री १२ते१ च्या दरम्यान सर्पदंश झाला व तिचा मृत्यू झाला. काकाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी रोहिणीचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली. रोहिणी तू काकाच्या लग्नात नवीन कपडे घालून मेहंदी काढशील का? असा आक्रोश कुटुंबीय करत होते. यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.