जळगाव लाईव्ह न्यूज । गुजरातमधील अहमदाबाद येथून चोरीला गेलेली ९ लाख रुपये किमतीची ‘किया कॅरेन्स’ कार जळगाव एमआयडीसी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून जप्त केली आहे. पोलिसांनी कारसह चालकाला बेड्या ठोकल्या असून, वाहनचोरीच्या एका आंतरराज्य गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे.

अहमदाबाद ग्रामीण भागातील भोपाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १५ एप्रिल रोजी ही आलिशान कार चोरीला गेली होती. याप्रकरणी तिथे गुन्हाही दाखल होता. दरम्यान, ही चोरीची कार नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगाव शहराच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत शहरातील काशीनाथ चौक परिसरात कडक नाकाबंदी लावली.

नाकाबंदीदरम्यान संशयित वाहन दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर वाहन अडविले. चौकशीदरम्यान ही कार गुजरातमधून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वाहनासह चालकाला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गुजरातमधील भोपाल पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर नियमानुसार सुमारे ९ लाख रुपये किमतीची किया कॅरेन्स (क्र. एमपी 04 झेडएल 5155) आणि चालक यांचा ताबा भोपाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. संदीप सपकाळे, पोहेकॉ. रमेश अहिरे आणि पोहेकॉ. अफजल बागवान यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.










