जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर बनावट आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्री महाजन यांचे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ केलेले बनावट फोटो फेसबुकवर पोस्ट करून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात फेसबुक खातेधारकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो पोस्ट करण्यात आले होते. हे फोटो आधुनिक ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आले होते. या फोटोंसोबतच महाजन यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि बदनामीकारक मजकूरही सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी सायबर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
फेसबुकवर ही आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे मूळ अकाऊंट कोणाचे आहे, याचा शोध सायबर पोलिसांचे तांत्रिक पथक घेत आहे. संबंधित आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा व्यक्तीचे अशा प्रकारे एआय किंवा मॉर्फ केलेले फोटो वापरून बदनामी केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.






