जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील कोळन्हावी ते डांभुर्णी रस्त्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आलेले प्रकरण पोलिस तपासात खुनाचे निघाले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या घटनेचा यावल पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत मृत तरुणाच्या तिघा मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे घटना?
कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (वय २६) याचा बुधवारी मध्यरात्रीनंतर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. काही तरुणांनी त्याला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला होता.

मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या. मृतदेहावरील जखमांचे स्वरूप आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा साधा अपघात नसल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन तसेच गुन्हे शोध पथकाने केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. तपासात पवनचा मृत्यू वाहनाच्या धडकेत नसून मारहाण आणि दगडाने ठेचून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पार्टीनंतर वादातून घडली हत्या
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन सोळंके आणि त्याचे काही मित्र बुधवारी रात्री पार्टीसाठी एकत्र आले होते. शेतातील पार्टी संपल्यानंतर काही जण घरी परतले. मात्र पवन आणि त्याचे तीन मित्र पुढे किनगाव परिसरात गेले. तेथून किनगाव-डांभुर्णी मार्गावरील पाटचारीवर गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात पवनला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघाताचा बनाव रचला. पवनचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही तपासणी केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोळन्हावी व डांभुर्णी परिसरात खळबळ उडाली असून मित्रांनीच मित्राचा जीव घेतल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.







