जळगावात ट्रक चालकाला चाकूने भोसकून लुटले, टोळीतील तिघे जेरबंद, एक फरार; तालुका पोलिसांची कारवाई

जून 21, 2026 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वीच एका दुचाकीस्वाराला अडवून लुटल्याची घटना ताजी असताना, शुक्रवारी मध्यरात्री हायवेवर पुन्हा एक थरारक दरोडा पडला. महामार्गावर कार आडवी लावून एका ट्रक चालकाला चाकूने भोसकण्यात आले. धक्कादायक म्हणजे, चालका जवळील साडेपाच हजार रुपयांची रोकड कमी पडल्याने लुटारूंनी ऑनलाईन ‘फोन पे’ द्वारे पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या १२ तासांच्या आत लुटारूंच्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे, यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश असून यातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.

lut1

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०) हे आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-१२ बीएच-३५३६) घेऊन जळगाव शहरातील गांधी चौक परिसरातून पाळधीकडे जात होते. त्यावेळी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी ट्रक अडवला. मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काळ्या आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले.

आरोपींनी जखमी चालकाच्या खिशातील ५,५०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. मात्र, एवढ्या मोठ्या गुन्ह्यासाठी ही रक्कम कमी वाटल्याने लुटारूंनी चालकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला आणि ‘फोन पे’ स्कॅनरच्या माध्यमातून ९८४ रुपये ऑनलाईन स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. या डिजिटल लुटीनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. जखमी चालकावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोडा व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका हद्दीत लागोपाठ घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशास खडबडून जागे झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध (DB) पथकाला रवाना केले. पथकाने अत्यंत कसोशीने आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत ३ मुख्य आरोपींना जेरबंद केले, तर एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल शेख जब्बार शेख उर्फ काळ्या (रा. पाळधी, ता. धरणगाव), विशाल चुडामण पाटील (रा. बिबा नगर, जळगाव) आणि मोहित हेमंत गुजर (रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांचा समावेश आहे. चौथा आरोपी हा विधीसंघर्षित बालक असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी साहिल शेख उर्फ काळ्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही धरणगाव पोलिस ठाण्यात बस अडवून चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी विशाल पाटील याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नयन पाटील तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now