हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२। हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवार दुपारी १२ वाजेला प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून 3955 क्यूसेक वेगाने पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहेत.

राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षी आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, काल अकोलासह बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुर्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

यामुळे आज दुपारी बारा वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने उघडून तापी नदी पात्रात 3955 क्युसेक्स वेगाने पाणी प्रवाह सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीय. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्यात येत असून हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.