⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पाणीपुरवठा योजनेच्या १२ इलेक्ट्रिक पंपासह अडीच लाखांचे साहित्य लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील कासोदा अंतुर्ली रस्त्यावरील विहिरीवरून अज्ञात इसमाने १२ इलेक्ट्रिक मोटर पंपासह ८ लोखंडी पाईप व ८ स्टार्टर असे एकूण २ लाख ५८ हजार किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सरपंच उमेश श्रीराम पाटील यांनी कासोदा पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना अंतुर्ली गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर कासोदा गावाकडे खदानी जवळ अंतुर्ली गावचे ग्रामपंचायत मालकीचे गावठाण जागेवर उभारण्यात आलेल्या १६ गावांना पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी जवळ घडली. १६ गाव योजना ही या अगोदर जिल्हा परिषदेच्या ताब्यात होती. परंतु, सदर योजनेतून अनेक गावे कमी झाल्याने किंवा त्यांनी स्वतः गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा सुरू केल्याने व नवीन योजना मंजूर करून घेतल्याने आपोआप त्या त्या गावांनी त्यांच्या पाणीपुरवठा बंद केला. उर्वरित गावांसाठी सदर योजनेसाठी एक शिखर समिती गठीत करून ही योजना त्यांच्या ताब्यात देण्यात आली व शिखर समितीचे अध्यक्ष म्हणून वनकोठे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच उमेश श्रीराम पाटील यांची तर सचिव म्हणून कासोदा ग्रामपंचायतचे उपसरपंच शेख अब्दुल अजिज अब्दुल बारी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.

सदर योजनेचे सदस्य म्हणून जवखेडेचे सरपंच दिनेश आमले, आडगाव सरपंच सुनिल दिलीप भिल तळई, सरपंच भाईदास मोरे हे काम पाहत होते. सदर योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रीक मोटारी बसवण्यात आलेल्या आहेत. परंतु, सदरची योजना ही सुमारे एक वर्षापासून बंद पडलेले आहे त्यामुळे आम्ही एक वर्षापासून तिकडे कोणीही गेलेलो नव्हतो. दि. ११ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास समिती अध्यक्ष व सचिव हे सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणावर अंतुर्ली शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता. त्यांना सदर ठिकाणी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रीक मोटारी व इतर साहित्य दिसले नाही. सदरच्या मोटारी व साहित्य चोरी झाल्याची खात्री झाल्याने वनकोठे सरपंच उमेश पाटील यांनी समितीच्या लोकांची बैठक घेऊन फिर्याद देण्यास कासोदा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीत २,५८,००० किमतीचे इलेक्ट्रिक मोटर पंप इलेक्ट्रिक साहित्य चोरीस नेले बाबत तक्रार दाखल करण्यात आली. तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस करीत आहेत.