⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्ह्यात राजकीय भूकंप : ११ भाजप नगराध्यक्षांसह नगरसेवक शिवसेनेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । आज बोदवडमधील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे 11 नगरसेवकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजपासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. बोदवड आणि मुक्ताईनगर या दोन्ही नगरपंचायतीत भाजपची सत्ता आहे. मात्र, आज शिवसेनेत प्रवेश करणारे दोन्हीकडील भाजप नगरसेवक येथील खडसे समर्थक आहेत. त्यामुळे हा शिवसेनेकडून जळगाव जिल्ह्यात भाजपासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगरातील ६ नगरसेवकांना प्रवेश देऊन शिवसेनेने माजी मंत्री खडसेंना जबरदस्त झटका दिला होता. आज मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

दरम्यान, यावेळी हा धक्का भाजपला आहे की एकनाथ खडसे यांना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी धक्का धक्का असतो. तो कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. तसंच हे नगरसेवक भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यामुळे हा धक्का भाजपलाच असल्याचं मी मानतो, असं पाटील म्हणाले.

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.