ठाकरे गटाला धक्का : ३ खासदार, ४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. सर्वच पक्षातील लोक शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र आता शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का देणार असून उद्धव ठाकरे गटातील तीन खासदार व चार आमदार शिंदे गटात येणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याबाबत दावा केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून तीन खासदार लवकरच शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले कि, काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. याचे उदाहरण सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंनी गटनेत्यांचा मेळावा घेतला त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर उपस्थित होते. त्यानंतर, शिवसेना-भाजपाचीच युती असली पाहिजे कारण ही नैसर्गिक युती आहे, असे कीर्तिकर म्हणाले होते.