जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावच्या तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. अर्जुन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीप्रमाणे, अर्जुन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) हा गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील चौकशीमध्ये संशयित मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतीक टी सेंटरजवळ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित अर्जुन कोळी यास ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहव प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी सर्व – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली. कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड (स्थानीय गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.