⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जागतिक मधमाशी दिन : जाणून घ्या, मधमाशांच्या गूढ अन् रहस्यमय जगातील अनेक गोष्टी…

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । मधमाशी पालन हा पारंपरिक व्यवसाय असलेल्या स्लोव्हेनिया या देशातील प्रसिद्ध मधमाशी अभ्यासक एंटोंन जांसा यांच्या कार्याची दखल घेत स्लोव्हेनिया देशाने जागतिक मधमाशी पालन संघटना, अन्न व कृषी संघटना यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र संघाने २०मे हा त्यांचा जन्मदिन जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. २०१८ पासून हा दिन साजरा केला जातो. मानवी जीवनातील मधमाशी आणि इतर परागीभवन करणाऱ्या सर्व किटक आणि पक्षी यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवून मधमाशी प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा यामागील उद्देश आहे.

मधमाशी आणि इतर परागीभवन करणारे किटक यांच्यामुळे अनेक वनस्पतींचे प्रजनन होत असते. त्यातील आपण अन्न म्हणून जे फळभाज्या, धान्य , फळे वापरतो ते सुद्धा यांच्यामुळेच मिळते, म्हणून मानवी अस्तित्वासाठी मधमाशी संवर्धन हि काळाची गरज आहे. मधमाशांमुळे फक्त एक समृद्ध जैवविविधता निर्माण होते. मधमाशापासून मिळणारे मध हे उत्तम पोषण आणि ऊर्जा देणारे. तसेच अनेक आजारामध्ये औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे मधुमक्षिका पालन हा व्यवसाय अनेक लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच साधन बनला आहे. सर्व मधमाशा समूहानेच राहतात असे नाही. तर काही मधमाशा एकटे राहणाऱ्या सुद्धा आहेत, त्यांना एकल मधमाशा म्हणतात. ज्यांचा परागीभवणात समूहाने राहणाऱ्या मधमाशा पेक्षा जास्त सहभाग होतो. पण आज मधमाशा च्या गूढ आणि रहस्यमय जगातील अनेक गोष्टींचा अभ्यास होणे बाकी असल्याने त्यांच्या संवर्धनात बरीच उदासीनता दिसून येत आहे.

मधमाशी अस्तित्वातील धोके

वाढते शहरीकरणामुळे त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास, स्थानिक प्रजाती नसल्याने झाडांची जास्त लागवड, जंगलातील वणवे आणि प्रचंड प्रमाणात वृक्षतोड , शेतीमध्ये बांधावरील झाडे अज्ञानातून तोडणे, पिकांची एकसुरी लागवड, प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ, मधमाश्यांच्या काही प्रजाती विशिष्ट आजारामुळे नष्ट होत आहेत(खुप संशोधन गरजेचे), मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या लहरी, कीटकनाशके आणि तणनाशक यांचा अतिवापर.

उपाय

सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात आणि शेतकरयांनी त्यांच्या शेताच्या बांधाला वर्षातील वेगवेगळ्या ऋतूत फुलोरा येणारी विविध देशी म्हणजेच स्थानिक प्रजातीची पळस, आपटा, करंज, रिठा, अर्जुन, खैर, हिवर, सालई यासारखी झाडे लावणे ज्यावर मधमाश्या आकर्षित होतात. शेताच्या बांधाला काही भाग हा नैसर्गिक अधिवास म्हणून राखुन ठेवणे, निसर्गातील मधमाशी पोळे यांना धक्का लावू नये किंवा त्रास देऊ नये, कीटकनाशके आणि तणनाशक यांचा वापर टाळणे किंवा कमी करणे, मधुमक्षिका पालन व्यवसाय वाढविणे, ग्राहकांनी मध शेतकऱ्याकडून खरेदी करणे, शालेय विद्यार्थ्यांना मधमाशी आणि त्याचे पर्यावरणातील महत्व पटवून देणे, शेतीला जैविक कुंपण करणे, यात सागरगोटे, चिलार, मेहंदी, निर्गुडी, बोर, बाभूळवर्गीय झुडूपे याची लागवड करणे.

– डॉ. संतोष उमराणे