
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणावरून अनिकेत मधुकर सपकाळे याने साथीदाराच्या मदतीने आपल्या भावाला आणि त्याच्यासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून गोळीबार केल्याचा आरोप आहे. जुन्या बसस्थानकासमोर घडलेल्या या घटनेत ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला गोपाळपुरा परिसरात वास्तव्यास असून, ती कंपनीत मजुरी करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करते. गेल्या तीन वर्षांपासून तिचे सोनीनगर, पिंप्राळा येथील रोहन मधुकर सपकाळे (३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, रोहनचा भाऊ अनिकेत याला या संबंधांना विरोध होता. याच मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी कुटुंबात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रोहन घराबाहेर राहत होता.
मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी रात्री रोहन आणि संबंधित महिला मेहरुण ट्रॅक परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, अनिकेत रोहनला वारंवार फोन करून त्याच्या ठावठिकाणाबाबत विचारणा करत असल्याची माहिती समोर आली आहे.कार्यक्रमानंतर मध्यरात्री साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास रोहन आणि महिला जेवणाचे पार्सल शोधण्यासाठी दुचाकीवरून निघाले. टॉवर चौकाकडून गोपाळपुराच्या दिशेने जात असताना ते जुन्या बसस्थानकासमोर पोहोचले.
याच वेळी अनिकेत हा एका साथीदारासह दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे आला. त्याने महिलेला शिवीगाळ करून रोहन आणि तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे. यातील एक गोळी महिलेच्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ लागली. गोळी लागल्याने ती रस्त्यावर कोसळली.घटनेनंतर दोन्ही संशयित तेथून पसार झाले. जखमी महिलेला रोहनने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमी महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे अनिकेत मधुकर सपकाळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, गोळीबारामागील नेमकी परिस्थिती आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास सुरू आहे. दसऱ्याच्या रात्री शहरातील जुन्या बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.





