जळगाव जिल्हा

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून खत खरेदीचा नवा नियम

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खत खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाची ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) ही नवीन प्रणाली २२ ऑक्टोबर २०२६ पासून जळगाव जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खत विक्री केंद्रांवर कोणती खते उपलब्ध आहेत, याची माहिती घरबसल्या घेता येणार आहे. तसेच उपलब्ध खतांचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधाही मिळणार आहे.

घरबसल्या कळणार खतांचा साठा

सध्या आवश्यक खतांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमध्ये जावे लागते. अनेकदा खत खरेदीसाठी रांगेत थांबावे लागत असल्याने वेळ आणि श्रम खर्च होतात. मात्र, नव्या FFS प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवरून परिसरातील खत विक्री केंद्रांमधील उपलब्ध खतांची माहिती घेता येईल. गरजेनुसार खतांचे आगाऊ बुकिंगही करता येणार असल्याने खत खरेदीचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

QR कोड दाखवताच करता येणार खत खरेदी

या प्रणालीमध्ये शेतजमिनीच्या तपशिलांच्या आधारे डिजिटल प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना QR कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. संबंधित प्रणालीने सूचित केलेल्या खत विक्री केंद्रावर जाऊन शेतकरी हा QR कोड दाखवू शकतील. विक्रेता QR कोड स्कॅन करून आवश्यक पडताळणी पूर्ण करेल. त्यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करता येईल. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती रोखण्यास मदत

काही ठिकाणी खत खरेदी करताना शेतकऱ्यांना इतर कृषी निविष्ठा किंवा उत्पादने घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. FFS प्रणालीमुळे खतांची उपलब्धता, बुकिंग आणि विक्री यांची डिजिटल नोंद ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती रोखण्यासाठी तसेच विक्री प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.

काळाबाजार आणि खतांच्या गैरवापराला बसणार आळा?

खतांचे अनधिकृत साठवण, वळवणूक आणि कृषीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा वापर नियंत्रित करण्याच्या दृष्टीनेही ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. डिजिटल पद्धतीने खत खरेदी-विक्रीची प्रक्रिया हाताळल्यामुळे वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणे अधिक सोपे होईल. परिणामी, खत वितरणातील अनियमितता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

FFS प्रणालीमुळे खतांची उपलब्धता तपासण्यापासून ते बुकिंग आणि प्रत्यक्ष खरेदीपर्यंतची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यासोबतच खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी २२ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणाऱ्या या नवीन प्रणालीची माहिती करून घ्यावी आणि उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button