
जळगाव लाईव्ह न्यूज । फेसबुकवर स्वस्त दरात मका मिळवून देण्याचे आमिष दाखवत चेन्नई येथील एका व्यापाऱ्याला २१ लाख ९४ हजार ४४० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चौघांसह संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पी. व्ही. सुरेश (वय ४५, रा. चेन्नई, तामिळनाडू) हे धान्याचे व्यापारी असून, सध्या जळगाव शहरातील भजे गल्ली परिसरातील मयूर लॉज येथे वास्तव्यास आहेत. शामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील आणि अजित जागीर सिंग सिद्धू या संशयितांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला.
स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर मका पुरवठा करण्याचे आश्वासन देत संशयितांनी सुरेश यांच्याशी व्यवहार निश्चित केला. त्यानंतर २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे स्वीकारण्यात आले. संबंधित बँक खात्यांमध्ये एकूण २१ लाख ९४ हजार ४४० रुपये जमा झाले.
पैसे मिळताच माल देण्यास टाळाटाळ
मक्याच्या पुरवठ्यासाठी लाखो रुपये दिल्यानंतरही व्यापाऱ्याला माल मिळाला नाही. सुरेश यांनी संबंधितांशी वारंवार संपर्क साधून व्यवहार पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही आणि मालाचा पुरवठाही करण्यात आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
चौघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा
या तक्रारीच्या आधारे शामलाल, विशाल शुक्ला, अविनाश पाटील आणि अजित जागीर सिंग सिद्धू यांच्यासह संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ऑनलाइन माध्यमातून व्यापारी व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळणे आणि आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.





