
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या खेडी शिवारातील माउली नगर परिसरात दसऱ्याच्या रात्री चॉपरने वार करून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. किरण विठ्ठल पाटील असे मृताचे नाव असून, किशोर छगन पाटील हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. दांडिया खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाइट चमकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी रोहित पाटील आणि मयूर जाधव या दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दसऱ्यानिमित्त माउली नगर परिसरात दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा महामार्गालगत हा कार्यक्रम सुरू असताना दुचाकीचा दांडिया खेळणाऱ्या महिलांवर हेडलाइट चमकला. यावरून विचारणा करण्यात आली असता दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती आहे.
मध्यस्थी करताच चॉपरने छातीत वार
वाद मिटवण्यासाठी किरण विठ्ठल पाटील आणि किशोर छगन पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचदरम्यान एका संशयिताने चॉपर काढून किरण पाटील यांच्या छातीत वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात किरण पाटील गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील हेही गंभीर जखमी झाले. दसऱ्याच्या रात्री घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका संशयिताचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तिघेही पसार झाले होते. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी रोहित पाटील आणि मयूर जाधव या दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वादाचे नेमके स्वरूप, हल्ल्यामागील कारण आणि संशयितांचा सहभाग याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.





