जळगाव शहर

५ हजारांपासून २५ हजारांपर्यंत दंड..; जळगाव मनपाचे कचऱ्याबाबत नवे नियम

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी महानगरपालिकेकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या, कचरा जाळणाऱ्या आणि कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक जागेत कचरा टाकल्यास १० हजार रुपये, तर उघड्यावर कचरा जाळल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. बांधकामाचा कचरा आणि वैद्यकीय कचरा नियमबाह्य पद्धतीने टाकणाऱ्यांवरही दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत नवीन घनकचरा व्यवस्थापन कार्यपद्धती आणि नियमावलीला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

उघड्यावर कचरा टाकल्यास १० हजारांचा दंड

शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने दंडात्मक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार उघड्यावर कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, बांधकामाचा कचरा टाकणे तसेच वैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणे अशा प्रकारांवर दंड आकारण्यात येणार आहे.

असा आकारला जाणार दंड

उघड्यावर कचरा जाळणे – ५,००० रुपये
सार्वजनिक जागेत कचरा टाकणे – १०,००० रुपये
बांधकामाचा कचरा नियमबाह्य पद्धतीने टाकणे – १०,००० रुपये
वैद्यकीय कचरा फेकणे – ५,००० रुपये
बल्क कचरा साचवणे – २५,००० रुपये

या नियमांमुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवीन नियमावलीनुसार प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि घरगुती घातक कचरा यांचा समावेश आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून न देणाऱ्या घरगुती नागरिकांकडून २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांनाही नियमांचे पालन करावे लागणार असून, नियमभंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक कार्यक्रमानंतर स्वच्छता न केल्यासही कारवाई

शहरात सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ किंवा इतर मोठे आयोजन केल्यानंतर परिसराची स्वच्छता न केल्यास आयोजकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकरणांत आयोजकांची अनामत रक्कम जप्त करण्यासोबतच ५ हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

घनकचरा प्रकल्पाचे काम केवळ १० टक्के

एकीकडे मनपाने घनकचरा व्यवस्थापनासाठी कठोर नियमावली मंजूर केली असली, तरी दुसरीकडे घनकचरा प्रकल्पाचे काम अद्याप केवळ १० टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि संपूर्ण यंत्रणा प्रभावीपणे राबवणे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button