⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. अनेकांना प्रश्‍न पडतो की, आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे नेमके काय असते? आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी एक दिवस आधी सादर करण्यात येतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाच्या येत्या आर्थिक वर्षाचा अंदाज मांडण्यात येतो. पण आर्थिक पाहणी अहवाल हा गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोगा असतो.

भारताच्या संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यास १९५१ सालापासून सुरुवात झाली. सन १९६३ पर्यंत देशाचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल हा एकत्रितपणे मांडण्यात यायचा. सन १९६४ पासून अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल हे वेगवेगळे करण्यात आले.

देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखेखाली आर्थिक पाहणी अहवाल तयार केला जातो. देशाचे अर्थमंत्री तो संसदेत सादर करतात. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने ज्या योजना सुरु केल्या होत्या त्या कितपत यशस्वी झाल्या आहेत याची सखोल माहिती या अहवालात असते. आर्थिक पाहणी अहवालाच्या या आकडेवारीवरुन सामान्य नागरिकाला आपल्या देशाची आर्थिक स्थिती काय आहे याचा अंदाज येतो.