जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२६ । देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली. दरम्यान यामध्ये देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या पहिल्या काही तासांतील सुरुवातीचे कल अत्यंत चुरशीचे आणि धक्कादायक असून, राज्यात ‘सत्तापालट’ होणार की ममता बॅनर्जी आपली सत्ता राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. एका जागेवर फेरमतदान होणार असल्याने, आज २९३ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. प्राथमिक कलानुसार भाजप आणि टीएमसी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच एका ठिकाणी पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. हे सुरूवातीचे कल असले तरी हा ममतांना धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी तब्बल ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये डीएमके ५९ जागांवर आघाडीवर आहे, त्याखालोखाल टीव्हीके १६ आणि एआयएडीएमके ३ जागांवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेस या टप्प्यावर कोणत्याही जागेवर आघाडीवर नाहीत. इतर पक्ष ५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या कलांनुसार बंगालमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. पण ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीकडून जोरदार टक्कर मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये फारसा फरक नाही. टीएमसी ११० तर भाजप ११६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. प्रसारमाध्यांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत दिसत आहे. हा फक्त सुरूवातीचा कल आहे. निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.









