जळगावातील अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर झळकणार शरद पवारांचा फोटो! राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू!

जुलै 12, 2026 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपप्रणीत महायुती यांच्यात पडद्यामागे काही शिजत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता जळगावातून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पक्षाच्या बॅनर आणि पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यास परवानगी मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

sanjay pawar

संजय पवार यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी संबंधित पत्रावर स्वतःच्या हस्ताक्षरात मान्यता नोंदवत स्वाक्षरी केल्याचे संजय पवार यांनी सांगितले. यासंदर्भातील पत्रही त्यांनी माध्यमांसमोर सादर केले.

संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी पक्षाच्या प्रचार साहित्यावर शरद पवार यांचे छायाचित्र नियमित वापरले जात होते. मात्र, पक्ष विभाजनानंतर तसे न करण्याच्या सूचनांमुळे ते बंद करण्यात आले. आता वैयक्तिक नातेसंबंध आणि कुटुंबीयांतील जुने संबंध लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा परवानगी मागितली होती.

त्यांनी पत्रात आपल्या वडिलांचे शरद पवार यांच्याशी असलेले जुने सहकार्य नमूद करत, मित्राच्या मुलाच्या नात्याने आपल्या प्रचार साहित्यावर त्यांचा फोटो वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. या विनंतीला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा संजय पवार यांनी केला आहे.

परवानगी मिळाल्यानंतर आगामी काळात आपल्या सर्व बॅनर आणि पोस्टरवर अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचेही छायाचित्र वापरणार असल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. तसेच ही परवानगी केवळ स्वतःपुरती नसून इतर कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा संवाद सुरू असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मात्र, या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निर्णयाचे पुढील राजकीय परिणाम काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now