मोठी बातमी! एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंच्या भेटीने राजकारणात खळबळ; नाथाभाऊ भाजपमध्ये परतणार?

जुलै 8, 2026 1:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२६ । महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही! अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची मुंबईतील भेट झालीय. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, ‘नाथाभाऊ’ पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार का? या चर्चांनी जोर धरला आहे.

vinod tawde eknath khadse

उत्तर महाराष्ट्रात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवणारे ओबीसी नेते म्हणून एकनाथ खडसे ओळखले जातात. मात्र, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी झालेले मतभेद यांमुळे त्यांनी भाजपला ‘रामराम’ ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधीही दिली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळापासूनच खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठत होत्या. अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा होऊनही राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडल्याचे बोलले जात होते.

अशातच थेट दिल्लीतील वजनदार नेते विनोद तावडे यांनी खडसेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजनांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व खडसेंना पुन्हा पक्षात घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भेट झाल्याची पुष्टी करताना कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

खडसे म्हणाले की, “विनोद तावडे हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट घेण्यासाठी माझ्या मुंबईतील घरी आले होते. त्यावेळी त्यांनी सदिच्छा भेट म्हणून माझी आणि माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आमच्यात केवळ वैयक्तिक गप्पा झाल्या.”

खडसे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबतची उत्सुकता कायम असून, आगामी काळात ते कोणता निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now