विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीने चर्चांना उधाण

जुलै 10, 2026 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या राजकीय भूमिकेबाबतचा सस्पेन्स आता आणखी वाढला आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने, खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करणार असल्याच्या चर्चांना प्रचंड जोर आला होता. मात्र, या सर्व चर्चा सुरू असतानाच आज शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतलीय. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

eknah khadse Uddhav Thackeray

काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांचा प्रवेश रेंगाळला होता. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाजपच्या बडे नेते विनोद तावडे यांनी त्यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर अवघ्या ४८ तासांत खडसे थेट ‘मातोश्री’च्या उंबरठ्यात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांचे पेव फुटले आहे. या भेटीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत हेही उपस्थित होते. तसेच खडसे यांचे समर्थक डॉ. अभिषेक ठाकूर यांनीही या भेटीत सहभाग घेतला.

दरम्यान, खडसे यांनी भेटीचे कारण स्पष्ट करत कोणत्याही प्रकारच्या राजकीय तर्कवितर्कांना फारसे महत्त्व नसल्याचे सूचित केले असले, तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतची उत्सुकता कायम आहे. आगामी काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार, भाजपमध्ये पुनरागमन करणार की राज्याच्या राजकारणात आणखी एखादे नवे समीकरण आकाराला येणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now