⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव शहरातील ‘या’ भागात येते महिनाभरापासून कमी दाबाने पाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । पिंप्राळा भागातील अनेक कॉलन्यांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. भर उन्हाळ्यात पुरेश्या प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असून नागरिकांकडून मनपा पाणी पुरवठा विभागाविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी, गणपतीनगर, ओमकार पार्क, माधव नगर, साई कल्पना रेसिडेन्सी, सुख अमृत नगरसह सावखेडा रोड परिसरात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या महिना भरापासून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वास्तविक जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात दोन वर्ष पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असतांना शहरातील नागरिकांना पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे.

मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत असून आयुक्तांनी दखल न घेतल्यास मनपावर हंडामोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

मनपालिकेकडून पिंप्राळा परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नाही, यापुर्वी उच्च दाबाने पाणी पुरवठा होत होता. मग आता ऐन उन्हाळ्यात कशामुळे कमी पाणी पुरवठा केला जात आहे.
विजयसिंग पाटील, नागरिक