⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उपमहापौरांच्या समोरच विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी कोरोना नियमांचे उल्लंघन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । शहरातील विकासकामांना सुरुवात होत असून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या भरगोस निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागात जवळपास ३ कोटींच्या कामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता तर गर्दी अधिक असल्याने देखील कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते.

जळगाव शहरातील विकासकामांना सुरुवात होत असल्याने जळगावकर काहीसे समाधानी झाले आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभात दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटींच्या कामातील विकासकामांचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला. प्रसंगी महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विकासकामांच्या उदघाटनसाठी कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजरात फटाके जोडून जल्लोषात साजरा करण्यात आलेल्या उदघाटन समारंभाला मोठी गर्दी जमलेली होती. उपमहापौर कुलभूषण पाटील यांचेच निकटवर्तीय कार्यकर्ते विनामास्क फिरत होते. पदाधिकारी मास्क लावून तर कार्यकर्ते बिनधास्त असल्याचे पाहावयास मिळाले. एकीकडे लोकप्रतिनिधी दररोज कोरोना बाधित होत असल्याचे ऐकण्यास मिळत असताना दुसरीकडे जळगावात नियमांचे उल्लंघन होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर नियम मोडल्यास कारवाई करण्यात येते तर लोकप्रतिनिधींना मात्र पाठीशी घातले जाते असे चित्र आहे. लोकप्रतिनिधीच विकासकामांच्या नावाखाली कोरोना नियमांची ऐशीतैशी करीत असतील तर कोरोना आटोक्यात राहणार कसा? गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आज झालेल्या कार्यक्रमात कोरोना पिंप्राळा परिसरात पोहचला तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा :