⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वात्सल्य समितीची दर १५ दिवसांनी होणार बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। रावेर तालुक्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांची माहिती अधिकाऱ्यांना नसल्याने व संबंधित अधिकारी फिरवाफिरव करत असल्याच्या तक्रारी वात्सल्य समितीच्या बैठकीत उपस्थित विधवा महिला व कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांनी केल्या. दरम्यान, यापुढे दर १५ दिवसातून बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले.

रावेर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात वात्सल्य समितीची बैठक झाली. अधिकाऱ्यांना कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांची माहिती नसल्याने व संबंधित अधिकारी फिरवाफिरव करत असल्याच्या तक्रारी यावेळी उपस्थित विधवा महिला व वारसांनी केल्या. यापुढे दर १५ दिवसातून बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन तहसीलदार देवगुणे यांनी दिले.

अधिकाऱ्यांनी पाठविले प्रतिनिधी
रावेर तालुक्यात कोरोनामुळे एकूण १८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सावदा येथील २२, रावेर येथील ५२ तर तालुक्यातील ग्रामीण भागातील १०९ जणांचा समावेश आहे. यापैकी ३४ महिलांच्या पतींचा मृत्यू झाल्याने त्या विधवा झाल्या आहेत. या महिलांना शासकीय नियमानुसार लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक तहसीलदार कार्यालयात बोलविण्यात आली होती. अनेक विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहता त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते. या पाठविण्यात आलेल्या प्रतिनिधींना माहिती देता आली नाही. त्यामुळे पंचायत समिती कार्यालय अधीक्षक निळे व महिला व बाल विकासच्या पर्यवेक्षिका शिंदे यांची चांगलीच झाडाझडती झाली.

बैठकीत, कोरोनामुळे पती, मुले गमावलेल्या निराधार महिला व एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा, निराधारांना तत्काळ अन्न सुरक्षा योजना, आर्थिक सहाय्य योजना द्यावी, वारसांना मृत्यूची कागदपत्रे द्यावी, कौशल्य योजनेचा लाभ द्यावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.